आठवणीतला किनारा
मनातले हुंदके ओठांवर आणत, एका हाताने आपले अश्रू पुसत ती बोलत होती, "बोल ना रे काहीतरी,असा किती वेळ गप्प बसणारेस??" पण तो मात्र शांतच होता, कदाचित न बोलुनच आपल्या अश्रूंचा बांध आवरत होता, सावरत होता स्वतःला. खरतर समुद्रकिनारी बसल्यावर लाटांचा किती भयंकर आवाज येत होता त्यादिवशी, मात्र त्या दोघांमधली शांतता समोर असणाऱ्या समुद्रालाही अचंबित करणारी होती. कधी एकदा तो आपल्याकडे बघेल आणि आपल्याशी बोलेल ह्या आशेने ती त्याच्याकडे अश्रू ढाळुन पाहात होती. पण एकवेळ समुद्रात असणारं अथांग पाणी बघण त्याला साह्य वाटत होत तिच्या डोळ्यांमधुन ओघळणारे अश्रू बघण्यापेक्षा. पायाच्या अंगठ्याने उगीचच वाळु बाजुला सारत कधी खाली तर कधी दुरवर समुद्राकडे तो पाहत होता. ह्या सगळ्याला कारणही तसच होत म्हणा.
सहा महिन्यांपुर्वी एकमेकांच आयुष्य सुखाने आपल्यापरीने जगणारे ते दोघे आज विलक्षण दु:खी होते. लहानपणापासूनच अनाथ असल्यामुळे रस्त्यावर वाढलेला तो, कष्टकरी, जिद्दी तसाच तापट आणि ज्या समाजाने आपल्याला स्विकारल नाही, आपली हिनवणी केली त्या समाजाचा प्रचंड राग असलेला. आणि इकडे वडील लवकरच गेल्यामुळे समंजस, मनमिळाऊ आणि आपल्या आईला जीव लावणारी, स्वतःच्या घराला हातभार लावणारी ती. दैवयोगाने एकाच गल्लीत राहायला असल्याने तिला तो चांगलाच भावला होता. तापट असला तरी मनाने साधा होता. अन आपल्यालाही कुणीतरी जीव लावणारं, कुणालातरी आपण आपलं म्हणु अस माणुस त्याला तिच्या स्वरुपात भेटल्याने विलक्षण खूष होता तो. समाजाविषयी त्याचा दृष्टीकोण तिच्यामुळेच तर बदलला होता, नाहीतर असही कोण होतं त्याला ह्या जगात??
जुन्या साऱ्या गोष्टी आठवुण ती त्याच्या खांद्याला खांदा ठेवुन आज रडत होती. दोन दिवसांवर आलेल लग्न अन हातावर काढलेली मेहंदी ह्याचही काही भान नव्हत तिला. कदाचित म्हणुनच की काय मेहंदीनेपण जास्त रंगण नापसंतच केल होत. नातेवाईकांनी बऱ्यावाईट परिस्थितीत केलेली मदत की काय म्हणुन उद्या ती त्यांच्या मर्जीनेच बोहल्यावर चढणार होती. आईला मात्र आपल्या मुलीच मन कळत होत, पण काही ईलाज नव्हता. अन शेवटी त्याच्या अश्रूंचा बांध फुटला अन तो बोलता झाला. समुद्रातुन येणाऱ्या लाटा किनाऱ्याजवळ येत होत्या अन किनाऱ्याला थडकत होत्या, पाण्याचा ओघ ओसरला की त्या परत समुद्राला जावुन मिळत होत्या. जणु ती ओढच की काय एवढ्या विशाल समुद्राला गवसणी घालुन पुन्हा पुन्हा समुद्राकडे आणत होती आणि काही क्षणांसाठी का होईना किनाऱ्याला धडकत होती. आपल्या लाटेच्या उन्मळत्या पाण्याने त्या रखरखलेल्या आणि तापत्या किनाऱ्याला धडकत होती अन परत सागरास मिळत होती. केवढी ती ओढ अन केवढा तो संघर्ष, आज तो ते दृष्य डोळ्यात साठवत होता, अन ती त्याला.
जिथे असशील तिथे आनंदाने राहा आणि परत कधी आलीस इकडे तर भेटेन मी तुला इथेच नक्की अस बोलुन तो चालता झाला. आज बरोबर एक वर्षाने ति तिच्या नवऱ्यासोबत पुन्हा त्या किनारी आलेली. मधल्या काळात तिने त्याची सगळीकडे चौकशी केली मात्र तो कुठेच सापडला नाही. किनाऱ्यावर अनवाणी चालताना एक लाट मात्र येवुन तिच्या पायावर आदळली, अन सुखावली ती, लाटेचा स्पर्श होताच तिला त्याची आठवण झाली. जेव्हा कधी पुन्हा इकडे येशील तेव्हा भेटेन तुला मी नक्की हे त्याचे शब्द आठवले अन मन दाटुन आले तिचे. विरुन गेला होता तो त्या लाटांमध्ये अन सामावुन घेतल होत त्याने स्वतःला त्या अथांग सागरात. फक्त ति जेव्हा त्या किनारी येईल तेव्हा लाट बनुन तिला भेटावयास येण्यासाठी. हो हो तोच होता तो, तिच्या आठवणीतला किनारा
साभार- चैतन्य दातखिळे
For more poem and story please visit on http://www.chaitanyadatkhile.blogspot.com
No comments:
Post a Comment