Friday, 20 September 2024

किंमत

 एखाद्या गोष्टीची किंमत अदा करताना कितीतरी गोष्टींची किंमत मोजावी लागते, हे सगळं करत असताना आपलीही नकळत किंमत केली जातेच, कधी स्वतःकडून तर कधी इतरांनाकडून. पण ती गोष्ट मिळाल्या नंतर त्या गोष्टीची किंमत तितकीच राहील ह्याचीदेखील शाश्वती नाही...किंबहुना नाहीच. आजकाल नात्यातही किंमत हि भौतिक वस्तू असलेल्या किमती वरूनच ठरवली जाते.


जर किंमतच सर्वकाही असेल तर सर्वकाही किमती का नाही??


                                                    -चैतन्य दातखिळे

                                                    दि.१९-सप्टेंबर-२०२४

Monday, 30 October 2023

वाट

कुणी अथक परिश्रम घेतलेल्या निकालाची वाट बघावी तर कुणी ह्या दुःखाचाही होईल अंत कधीतरी ह्याची वाट बघावी. परिस्थितीमुळे सोडून गेलेल्या माणसांचीही वाट बघावीशी वाटते कधीकधी. तर कधी परतूनच न येणाऱ्या माणसाची अविरत वाट बघावी. मरणप्राय यातना भोगत असताना होऊदेत शेवट आता तरी म्हणून मरणाची वाट बघावी तर कधीतरी ह्या अगणित सुखानंतर दुःखाची झालर येईलही नकळत ह्याची वाट बघावी. वाटेकडे डोळा लावून वाट बघत बसणाऱ्यांची वाटही लागते कधीकधी पण वाट मात्र दिसत नाही.

वाटा संपून जातात, वाट बघणं मात्र संपत नाही.

                                                              -चैतन्य दातखिळे

                                                              दि.३१-१०-२०२३


Sunday, 22 October 2023

सौंदर्य

सुंदर दिसणारी व्यक्ती नेहमीच आकर्षक वाटते, पण फक्त सुंदर दिसणं म्हणजे सौंदर्य नव्हे. कुणी मनाने सुंदर असतं तर कुणी विचारांनी. कुणाची वागण्याची पद्धत सुंदर वाटते तर कुणाचं बोलणं ऐकताना आपण हरखुन जातो. ज्ञानाने चेहऱ्यावर आलेलं तेजोमय सौंदर्य हि वेगळं आणि प्रामाणिक कष्ट केल्यावर मिळालेल्या समाधानानं चेहऱ्यावर झळाळणारं सौंदर्य हि वेगळं. दुसऱ्याच्या दुःखात दुःख जाणणारेही कमालीचे सुंदर असतात. म्हटलं तर सौंदर्याच्या खूप साऱ्या संज्ञा सांगता येतील, आपण वाटून घेऊ तसं सौंदर्यही आहेच कि.

सौंदर्य शोधणाऱ्याची मानसिकताही सुंदर असायला हवी, म्हटलं तर चिखलात राहूनही कमळ आपलं सौंदर्य खुलवतं, बहरतं. आणि म्हटलं तर सर्व सोयीयुक्त रोपवाटिकेतल्या फुलांनाही आपलं सौंदर्य जोपासता येत नाही. सौंदर्यच ते, मुळात असावं लागतं.

-चैतन्य दातखिळे

दि.२३-१०-२०२३


Saturday, 21 October 2023

निरोप

 निरोप...नेहमीच त्रासदायक वाटणारा शब्द. कुणी आपल्याला दिलेला निरोप तर कधी आपण कुणाला दिलेला निरोप हा मनात नेहमीच काहीतरी सल ठेवून जातो. जवळच्या व्यक्तीनं सांगून घेतलेला निरोप निःसंदेह दुःख देणारा,पण न सांगून घेतलेला निरोप त्याहून दुःख देणारा असतो. कधीकधी कुणी आपला निरोप घेईल ह्या विचारानेच काळजात धस्स होतं तर निरोप घेतल्यावर काय होईल ह्याचा विचार न केलेलाच बरा. कधी वाईट तर कधी चांगल्यासाठी निरोप घेतलाही जातो, मात्र त्यातून होणारी ताटातूट हि आलीच.

तसा निरोप कधी चांगलाही...मनाने दूषित विचारांना, ज्ञानाने अज्ञानाला, स्त्रीने मत्सराला, पुरुषाने अहंकाराला आणि विद्यार्थ्याने आळसाला निरोप दिला तर किती चांगलं होईल. पण निरोप देणार कोण?

-चैतन्य दातखिळे

दि.२१-१०-२०२३

Friday, 20 October 2023

बिगारी

 सकाळी सकाळी जर आपण कुठे शहरातील चौकात गेलो तर तिथे हातात जेवणाचा डबा घेऊन खाली बसलेले बिगारी बऱ्याचदा दिसतात. मग कुणीतरी माणूस येऊन काम सांगतो आणि हे लोक मिळेल ते काम हाती घेतात आणि ठरलेल्या मोबदल्यात दिवसभर करतात. काम करताना आपल्या आवडीचं काम मिळेलच ह्याची अजिबात शाश्वती नाही, काम मिळतंय हिच फार मोठी गोष्ट त्यांच्यासाठी. आज काम केल्यावर काही मोठी गोष्ट करावी किंवा घ्यावी म्हटलं तर कधी पुरेसे पैसे नाहीत किंवा उद्या काम मिळेल ह्याचा भरवसाही नाही.

आपली अवस्था सुद्धा त्या बिगाऱ्यासारखीच. नशीब आपल्याला काय देऊन जाईल ह्याची खात्री नाही. दिलं काही तरी स्विकारण्याशिवाय पर्याय नाही.आणि काही शाश्वत करायचं म्हटलं तर आपला भरवसाही नाही.

-चैतन्य दातखिळे

दि.२०-१०-२०२३


Sunday, 15 October 2023

वेळ

"अरे आजकाल वेळच नाही मिळत बघ काही दुसरं करायला." कसं बसं हसून ती बोलली खरी पण ते हसणं सुद्धा ओढून-ताणूनच होतं हे सहज कळण्यासारखं होतं. एकेकाळी मनमुरादपणे जगणारी आणि स्वतःच्या आवडीनिवडी जपणारी ती आज जर तिला काय आवडतं विचारलं तर घरच्यांच्या आवडीनिवडी सांगत बसते. घर, ऑफिस, मुलांचं शिक्षण ह्यात काही स्त्रिया इतक्या गुरफटून जातात कि कधीतरी वाटतं सांगावं त्यांना थांब जरा, श्वास घे आणि मग लाग परत कामाला. अर्थात, कुठल्याही स्त्रीला विचारलं तर तिला आवडतं हे सगळं म्हणून ती करते हेच तिचं उत्तर असतं. पण तीच आवड जबाबदारी आणि गृहीत कधी बनते हे तिचं तिलाच कळत नाही.

ह्याला पर्याय म्हणून इतरांनी वेळेला वेळ काढला तर वेळ वाचेलसुद्धा, वेळ गेल्यावर वेळ काढून त्या वेळेचा काय उपयोग?

                                                                -चैतन्य दातखिळे

                                                                दि.१६-१०-२०२३

Saturday, 14 October 2023

प्रवास

 "यात्रीगन कृपया ध्यान दे" अशी अनाऊन्समेंट ऐकली आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवर बसलेल्या माणसावरची माझी स्थिर नजर हटली. कितीतरी वेळ फोनवर बोलून तो कुणाची तरी रडत समजूत काढत होता असं प्रथमदर्शनी वाटलं. तसं पुरुष म्हटलं कि निष्ठुर, कठोर मनाचा, भावनाराहित असं बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळतं, पण सगळेच पुरुष तसे नसतात...किमान त्याच्याकडे बघून तरी मला तसं वाटलं. हताश होऊन फोन ठेवल्यावर कितीतरी वेळ तो रेल्वे ट्रॅक कडे शून्य नजरेने बघत होता. त्यावेळी त्याच्या मनात काय काय विचार आले असतील देव जाणे. त्याची पुढची प्रतिक्रिया काय असेल ह्या उत्सुकतेपोटी मी माझ्या १-२ ट्रेन सोडल्या देखील. पण तो मात्र तसाच स्तब्ध बसून होता. अजून कितीवेळ बसणार होता माहित नाही, शेवटी कंटाळून मी माझी ट्रेन पकडली आणि पुढील प्रवासाला लागलो.

जीवनात काय किंवा प्रवासात काय प्रत्येकाला त्याच्या शेवटच्या ठिकाणावर पोहोचता येईलच असं नाही. काहींचा प्रवास अर्ध्यापर्यंत जातो तर काहींचा प्रवास सुरूच होत नाही.

                                                         -चैतन्य दातखिळे

                                                         दि.१५-१०-२०२३