Monday, 30 October 2023

वाट

कुणी अथक परिश्रम घेतलेल्या निकालाची वाट बघावी तर कुणी ह्या दुःखाचाही होईल अंत कधीतरी ह्याची वाट बघावी. परिस्थितीमुळे सोडून गेलेल्या माणसांचीही वाट बघावीशी वाटते कधीकधी. तर कधी परतूनच न येणाऱ्या माणसाची अविरत वाट बघावी. मरणप्राय यातना भोगत असताना होऊदेत शेवट आता तरी म्हणून मरणाची वाट बघावी तर कधीतरी ह्या अगणित सुखानंतर दुःखाची झालर येईलही नकळत ह्याची वाट बघावी. वाटेकडे डोळा लावून वाट बघत बसणाऱ्यांची वाटही लागते कधीकधी पण वाट मात्र दिसत नाही.

वाटा संपून जातात, वाट बघणं मात्र संपत नाही.

                                                              -चैतन्य दातखिळे

                                                              दि.३१-१०-२०२३


Sunday, 22 October 2023

सौंदर्य

सुंदर दिसणारी व्यक्ती नेहमीच आकर्षक वाटते, पण फक्त सुंदर दिसणं म्हणजे सौंदर्य नव्हे. कुणी मनाने सुंदर असतं तर कुणी विचारांनी. कुणाची वागण्याची पद्धत सुंदर वाटते तर कुणाचं बोलणं ऐकताना आपण हरखुन जातो. ज्ञानाने चेहऱ्यावर आलेलं तेजोमय सौंदर्य हि वेगळं आणि प्रामाणिक कष्ट केल्यावर मिळालेल्या समाधानानं चेहऱ्यावर झळाळणारं सौंदर्य हि वेगळं. दुसऱ्याच्या दुःखात दुःख जाणणारेही कमालीचे सुंदर असतात. म्हटलं तर सौंदर्याच्या खूप साऱ्या संज्ञा सांगता येतील, आपण वाटून घेऊ तसं सौंदर्यही आहेच कि.

सौंदर्य शोधणाऱ्याची मानसिकताही सुंदर असायला हवी, म्हटलं तर चिखलात राहूनही कमळ आपलं सौंदर्य खुलवतं, बहरतं. आणि म्हटलं तर सर्व सोयीयुक्त रोपवाटिकेतल्या फुलांनाही आपलं सौंदर्य जोपासता येत नाही. सौंदर्यच ते, मुळात असावं लागतं.

-चैतन्य दातखिळे

दि.२३-१०-२०२३


Saturday, 21 October 2023

निरोप

 निरोप...नेहमीच त्रासदायक वाटणारा शब्द. कुणी आपल्याला दिलेला निरोप तर कधी आपण कुणाला दिलेला निरोप हा मनात नेहमीच काहीतरी सल ठेवून जातो. जवळच्या व्यक्तीनं सांगून घेतलेला निरोप निःसंदेह दुःख देणारा,पण न सांगून घेतलेला निरोप त्याहून दुःख देणारा असतो. कधीकधी कुणी आपला निरोप घेईल ह्या विचारानेच काळजात धस्स होतं तर निरोप घेतल्यावर काय होईल ह्याचा विचार न केलेलाच बरा. कधी वाईट तर कधी चांगल्यासाठी निरोप घेतलाही जातो, मात्र त्यातून होणारी ताटातूट हि आलीच.

तसा निरोप कधी चांगलाही...मनाने दूषित विचारांना, ज्ञानाने अज्ञानाला, स्त्रीने मत्सराला, पुरुषाने अहंकाराला आणि विद्यार्थ्याने आळसाला निरोप दिला तर किती चांगलं होईल. पण निरोप देणार कोण?

-चैतन्य दातखिळे

दि.२१-१०-२०२३

Friday, 20 October 2023

बिगारी

 सकाळी सकाळी जर आपण कुठे शहरातील चौकात गेलो तर तिथे हातात जेवणाचा डबा घेऊन खाली बसलेले बिगारी बऱ्याचदा दिसतात. मग कुणीतरी माणूस येऊन काम सांगतो आणि हे लोक मिळेल ते काम हाती घेतात आणि ठरलेल्या मोबदल्यात दिवसभर करतात. काम करताना आपल्या आवडीचं काम मिळेलच ह्याची अजिबात शाश्वती नाही, काम मिळतंय हिच फार मोठी गोष्ट त्यांच्यासाठी. आज काम केल्यावर काही मोठी गोष्ट करावी किंवा घ्यावी म्हटलं तर कधी पुरेसे पैसे नाहीत किंवा उद्या काम मिळेल ह्याचा भरवसाही नाही.

आपली अवस्था सुद्धा त्या बिगाऱ्यासारखीच. नशीब आपल्याला काय देऊन जाईल ह्याची खात्री नाही. दिलं काही तरी स्विकारण्याशिवाय पर्याय नाही.आणि काही शाश्वत करायचं म्हटलं तर आपला भरवसाही नाही.

-चैतन्य दातखिळे

दि.२०-१०-२०२३


Sunday, 15 October 2023

वेळ

"अरे आजकाल वेळच नाही मिळत बघ काही दुसरं करायला." कसं बसं हसून ती बोलली खरी पण ते हसणं सुद्धा ओढून-ताणूनच होतं हे सहज कळण्यासारखं होतं. एकेकाळी मनमुरादपणे जगणारी आणि स्वतःच्या आवडीनिवडी जपणारी ती आज जर तिला काय आवडतं विचारलं तर घरच्यांच्या आवडीनिवडी सांगत बसते. घर, ऑफिस, मुलांचं शिक्षण ह्यात काही स्त्रिया इतक्या गुरफटून जातात कि कधीतरी वाटतं सांगावं त्यांना थांब जरा, श्वास घे आणि मग लाग परत कामाला. अर्थात, कुठल्याही स्त्रीला विचारलं तर तिला आवडतं हे सगळं म्हणून ती करते हेच तिचं उत्तर असतं. पण तीच आवड जबाबदारी आणि गृहीत कधी बनते हे तिचं तिलाच कळत नाही.

ह्याला पर्याय म्हणून इतरांनी वेळेला वेळ काढला तर वेळ वाचेलसुद्धा, वेळ गेल्यावर वेळ काढून त्या वेळेचा काय उपयोग?

                                                                -चैतन्य दातखिळे

                                                                दि.१६-१०-२०२३

Saturday, 14 October 2023

प्रवास

 "यात्रीगन कृपया ध्यान दे" अशी अनाऊन्समेंट ऐकली आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवर बसलेल्या माणसावरची माझी स्थिर नजर हटली. कितीतरी वेळ फोनवर बोलून तो कुणाची तरी रडत समजूत काढत होता असं प्रथमदर्शनी वाटलं. तसं पुरुष म्हटलं कि निष्ठुर, कठोर मनाचा, भावनाराहित असं बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळतं, पण सगळेच पुरुष तसे नसतात...किमान त्याच्याकडे बघून तरी मला तसं वाटलं. हताश होऊन फोन ठेवल्यावर कितीतरी वेळ तो रेल्वे ट्रॅक कडे शून्य नजरेने बघत होता. त्यावेळी त्याच्या मनात काय काय विचार आले असतील देव जाणे. त्याची पुढची प्रतिक्रिया काय असेल ह्या उत्सुकतेपोटी मी माझ्या १-२ ट्रेन सोडल्या देखील. पण तो मात्र तसाच स्तब्ध बसून होता. अजून कितीवेळ बसणार होता माहित नाही, शेवटी कंटाळून मी माझी ट्रेन पकडली आणि पुढील प्रवासाला लागलो.

जीवनात काय किंवा प्रवासात काय प्रत्येकाला त्याच्या शेवटच्या ठिकाणावर पोहोचता येईलच असं नाही. काहींचा प्रवास अर्ध्यापर्यंत जातो तर काहींचा प्रवास सुरूच होत नाही.

                                                         -चैतन्य दातखिळे

                                                         दि.१५-१०-२०२३

Friday, 13 October 2023

कोपरा

लहानपणी मातीच्या घरात राहत असताना भिंतीत काढलेली मांडणी होती व त्यात एका बाजूला अगदी छोटासा मिळालेला मला कोपरा. शाळेत असताना शाबासकी म्हणून मिळालेली पेन्सिल, पाहुण्यांनी कधी दिलेली पाच रुपयांची नोट, मित्राने स्वतःच्या पैशाने खरेदी करून दिलेल्या चार अण्याच्या पार्लेजी चॉकलेटचा कागद तर कधी एखाद्या मुलीचा ढापलेला खोडरबर. सारं काही अगदी व्यवस्थित जपून आणि त्यावर कुणाला दिसू नये म्हणून रुमाल ठेवून झाकलेलं असायचं. कधी आठवण आलीच तर उचकुन बघायचं आणि कुणी आपल्याला बघायच्या आत परत पटकन झाकून ठेवायचं हा नित्यक्रम.

तसा प्रत्येकाच्या मनात आजही एक गुपित कोपरा असतोच ज्याच्यात अशा काही सुप्त गोष्टी दडवून ठेवलेल्या असतात हमखास. कधीतरी आठवण आली कि आपण त्या कोपऱ्यात हळूच डोकावतो, आठवणींना उजाळा देतो आणि कुणाला कळायच्या आत परत चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन वर्तमानात परततो. घरात काय किंवा मनात काय आपल्याला आपल्यात हरवून ठेवणारा कोपरा हवाच.!

-चैतन्य दातखिळे

दि.१४-१०-२०२३

Thursday, 12 October 2023

सागर

 अथांग, विशाल, महाकाय अशी नानाविध विशेषणं लाभलेला सागर. बेमालूमपणे स्वतःच्या मस्तीत आणि तितकाच शिस्तीत भासणारा. काही चांगलं-वाईट घडलं त्याच्यामुळे तरीही नाव फक्त त्याचंच. पण ह्या सगळ्यात त्याच्यात सामावून गेलेल्या तिचं अस्तित्व कुठेच दिसत नाही. डोंगरदऱ्यांच्या कानाकोपऱ्यातून वाहत येऊन आपलं प्रचंड मोठं विस्तीर्ण साम्राज्य उभी करणारी ती सरिता, कित्येक गाव वाड्यांची, गुरा ढोरांची अन हरेक जीवाची तहान आपल्या गोड चवीने भागवणारी सरिता जेव्हा त्या सागरास जाऊन मिळते तेव्हा तिला तिचं अस्तित्वही मागे ठेऊनच यावं लागतं. इतकच कि काय आपली गोड चव विसरून खारट चवही ती अंगिकारते.

म्हणूनच कि काय ऐक वेळ तिचं अस्तित्व सागरासोबत जाणवत नसेलही, मात्र अनादी अनंत काळ तिची जलदेवता म्हणून पूजा करून जो बहूमान तिला मिळतो ते भाग्य सागरापाशी नाही...किंचितही नाही.

-चैतन्य दातखिळे

दि.१३-१०-२०२३

साधर्म्य

 कुणाला कुणाच्यातरी स्वभावाशी साधर्म्य वाटतं तर कुणाला एखाद्याच्या विचारांशी साधर्म्य वाटतं. विचार करू शकेल असा प्रत्येक जीव कधी ना कधी एक दुसऱ्याच्या सुख-दुःखात साम्य शोधण्याचा प्रयत्न करतच असतो, आणि ते शोधूनही नाही मिळालं तर ते दुःख वेगळंच. आपल्याकडे काय काय आहे हे उमजून घेतल्यावर बरोब्बर आपण तिच व्यक्ती साम्य शोधण्यासाठी निवडतो जिच्याकडे आपल्यापेक्षा काहीतरी कमी आहे, मुद्दामहून. आणि मग सुरु होतो बरोबरीचा खेळ. आत्मिक समाधान त्याशिवाय कसं मिळणार म्हणा.

साम्य करताना बरोबरी अनायासे होत असेलही, मात्र तुलना करताना जो नकळतपणे अहंकार आणि तिरस्कार वाढत जातो त्यापेक्षा आपलं साधर्म्य केव्हाही बरंच म्हणायचं.

-चैतन्य दातखिळे

दि.१२-१०-२०२३

Wednesday, 11 October 2023

निवांत

पैली माणसं लै निवांत व्हती...ना कस्ली चिंता ना कंचा डोसक्यात इच्चार. आला दिवस ढकलायचा येवढंच त्यास्नी ठावं असायचं. झालं येकांद काम तर झालं नायत आपल्या नशिबात न्हवतं आसं म्हणून सुडुन द्यायचं अस्सा निवांतपणा. मला लै अप्रूक वाटायचं आसं जुन्या माणसांचं कधी काय आयकल की. म्हटलं व्हावं आपुन बी निवांत पहिल्या माणसांसारखं, काय व्हतंय त्याला. आसा इच्चार कर्तो ना कर्तो तोच ब्यांकेचा घरच्या हापत्याचा म्यासेज आला आन आख्या इचारावं पाणी फिरलं, लागलो पुण्यास्नी व्हतो तसा गपगुमान कामाला.

निवांतपणा वगैरे काय नस्तोय बघा....


-चैतन्य दातखिळे

दि. ११-१०-२०२३


Tuesday, 10 October 2023

सोबत

 प्रिय सखी,

तुझ्या अनेक स्वप्नांचा चुराडा केलेला मी

आणि एवढं असूनही माझ्यावर नितांत प्रेम करणारी तू


तुझ्या अनेक विचारांना अडथळा आणणारा मी

आणि त्यातूनही मार्ग काढून नवीन पर्याय शोधणारी तू


बऱ्याचदा तुझ्या मनस्तापाच कारण मी

आणि प्रत्येकवेळी माझ्या आनंदाचं कारण तू


जगात भौतिक गोष्टी शोधत बसणारा मी

अन माझ्यातच तुझं जग शोधणारी तू


माहित नाही काय आणि कसं असेल पुढे आयुष्य

खात्रीने सांगतो पण, असशील सोबत तर सुखकर होईल भविष्य.


चैतन्य दातखिळे

दि.१६-फेब्रुवारी-२०२३


उसंत

जबाबदारी, कर्तव्य आणि आवड ह्यातील तू काय निवडशील?? प्रश्न नेहमीचाच, ओळखीचा. उत्तरही ठरलेलं, नेहमीचंच. कर्तव्य म्हटलं कि त्यासोबत जबाबदारी हि आलीच, ती जबाबदारी आवडीने स्वीकारली आणि जोपासली कि त्यातूनही सुख मिळतच निश्चित.

उसंत मिळेल तेव्हा मात्र जोपासेल आवड फक्त...त्यावेळी जबाबदारीही तीच असेल आणि कर्तव्यही तेच. तोपर्यंत तरी उसंत नाही.

-चैतन्य दातखिळे
दि. १७/०१/२०२३

परपोज

हिऱ्यामोत्याची अंगठी नाही द्यायला, चाफ्याची फुलं गुंफलेली अंगठी समजुन घे

सोन्याचांदीचा हार नाही द्यायला, प्राजक्ताच्या फुलांचा हार समजुन घे

कपाळी सोनेरी बिंदी नाही द्यायला, करांड्यातील माझ्या नावाचं कुंकू समजून घे

सोन्याच्या बांगड्या नाही द्यायला, गजऱ्याची माळ हाती बांधील समजुन घे

असेल तुझं जग खूप मोठं आणि मस्त

माझ्या मनात मात्र तूच असतेस फक्त

तूच माझा गुलाब, टेडी,चॉकलेट आणि रोज

स्विकारशील का आज माझा आगळावेगळा प्रपोज.


-चैतन्य दातखिळे

दि. ०८-०२-२०२०

मोगरा

ऐक ना! आज पण तुझ्यासाठी छानसा गजरा आणलाय मी, तु लावलेल्या परसबागेमधला...अगदी तुला आवडतो ना तसाच. दररोज तुझ्या स्मारकावर वाहून कंटाळा आलाय बघ. ठरलं होत ना आपलं, आपण असु दोघांना सोबत, शेवटपर्यंत. मग अशीच कशी सोडून गेलीस मध्येच न सांगता?? तुला अधिकार नाही हा तो, मला कुठलीच गोष्ट न सांगता करण्याचा. एक गम्मत सांगू? लोकं वेडा म्हणतात मला मी हा असा रोज तुझ्या स्मारकाजवळ येऊन बसतो म्हणून, त्यानिमित्ताने का होईना मला तुझ्याजवळ तासनतास बसून गप्पा तरी मारता येतात. कुणी अडवत पण नाही त्यामुळ कि साधं विचारत नाही बाबा कसायेस तू. मी मात्र हसतो लोकांच्या ह्या वेडेपणावर.

पोरांनी वाटण्या केल्या. घराची, जमिनीची आणि अगदी माझी सुद्धा... हक्काचं म्हणशील तर तू, मी, घरामागची तुझी हि स्मारकाची जागा अन त्याच्याच बाजूला स्मारका इतकी जागा घेतलीय मी वाट्याला. अगोदरच तू एवढी दूर गेल्यावर अजून तुझ्यापासून दूर जायला नसतं जमलं बघ मला. आता मात्र दमलो गं मी, नाही होत चालायला आणि बोलायला सुद्धा, बसू का आज जरा निवांत तुझ्याशेजारी?? तुझ्याकडे पाहात?? 

वेडा म्हातारा गेला म्हणुन गावकऱ्यांनी बोंब उठवली.सगळं काही गावानेच केलं, तुझ्या बाजूला माझं स्मारक सुद्धा. आपली पोरं आतासुद्धा नाही आली गं शेवटचं भेटायला. मला तर ना हि गावातली लोकंच वेडी वाटतात, किती करतात हि दुसऱ्या लोकांसाठी...शेवटचं कार्य काय आणि स्मारक काय. ह्या वेगळ्या जगात तुला शोधणं कठीण वाटतंय मला, पण मला माहितीये तू सापडशील. परसबागेतील मोगऱ्याचा गजरा आजही तू केसात माळलायेस ना, मी तुला त्या वासाने शोधत यावं म्हणून....


-चैतन्य दातखिळे

दि. २५-सप्टेंबर-२०२०

भेट

 वर्ष सरली कित्येक भेटुनी तुला पुन्हा

पोचलो ना वेळेवर हाच का माझा गुन्हा

स्वप्न सरली, आसवे विरली शोधता पाऊलखुणा

कैक रंग जीवनी, आज एक रंग तुझा उणा


खंत वाटे आजही भांबावल्या माझ्या मना

शोधताही सापडेना वाट पुन्हा ह्या दीना

चित्त हरले श्वास उरला शेवटचा ह्या तना

आठवेल का तुला आजतरी भाका-आणा


-चैतन्य दातखिळे

दि. ०१-मे-२०२२

शोध

 पुन्हा तीच गर्दी, तीच धावपळ, ट्रेन मिळण्यासाठी केलेली धडपड

ट्रेन मिळल्यावरही तू कुठेतरी, कधीतरी दिसशील अनपेक्षितपणे ह्यासाठी फिरवलेली हजारो माणसांवर नजर

त्यातही तू कुठेच नाहीस, हवालदिल होऊन मनाला विचारलं सुद्धा, माझ्याच बाबतीत असं का??

उत्तर अनपेक्षित मात्र मनातलंच. तू ज्याला शोधतोयेस ते आहे तुझ्यातच, ज्यावेळी माती होईल देहाची त्यावेळी नीट निरखून बघ...त्या मातीतच सामावलेलं मिळेल तुला, निरंतर.!

चैतन्य दातखिळे

दि.१५-फेब्रुवारी-२०२३

ओलावा-१

 रपरपलेल्या उन्हाने जमिनीची दाह होत असताना कुठेतरी पावसाचे थेंब आज जमिनीवर कोसळले आणि त्या जमिनीने अक्षरशः अधाशासारखं ते पाणी पिऊन टाकलं. ह्या परिस्थितीत देखील परतावा म्हणून जमिनीने मातीचा सुगंध दिला ज्याची तुलना कशाशीच नाही. ओलावा जपला तर परतावा मिळतो नक्की, मग तो मातीचा असो वा नात्यांचा.!


-चैतन्य दातखिळे

दि. १६-मार्च-२०२३

उचकी

 लहानपणी उचकी आली कि फार बरं वाटायचं. कुणीतरी आपली आवर्जून आठवण काढतंय हि भावनाच किती सुखावणारी होती हे आत्ता समजतं. मग कुणीतरी आपली आठवण काढतंय म्हणून उगीचच मित्र-मंडळींना, नातेवाईकांना भेटून किंवा फोन करून विचारायचं तू माझी आठवण काढलीस का? ह्यात पण फार समाधान वाटायचं. पोरकटपणाच होता तो म्हणा...पण तो एक नवी उमेद देऊन जायचा पुढच्या काही दिवसांसाठी.

आजकाल ना कधी उचकी येत ना कधी कुणाला आठवायला वेळ असतो. आज आलेली मात्र उचकी बऱ्याच दिवसांनी, पण ना त्यानंतर लगेचच पहिल्यासारखा आठवणींचा कल्लोळ माजला ना ती उचकी आपलीशी वाटली. उचकीच ती, आली आणि लगेच गेली.

-चैतन्य दातखिळे

दि.१०-१०-२०२३